google-site-verification: googlea24dc57d362d0454.html भारतीय भाज्या Indian Vegetables

भारतीय भाज्या Indian Vegetables

https://shrikant89.blogspot.com

भाज्या ....................
१. पलॉवर बटाटा रस्सा
साहित्य :
पंधरा सपाट वाट्या फ्लॉवर चिरून, पाच वाट्या कच्च्या बटाट्याच्या सालं काढून फोडी, दोन वाट्या चिरलेला टोमॅटो, तीन वाट्या चिरलेला कांदा, एक वाटी मटार दाणे, पाव वाटी आलं तुकडे, पाव वाटी चिरलेला लसूण, एक वाटी सुक्या खोबऱ्याची पूड, वीस-पंचवीस कढीलिंबाची पानं, दोन-तीन वाट्या चिरलेली कोथिंबीर, दोन चमचे जिरं पूड, पाच चमचे गोडा (काळा) मसाला, एक चमचा लाल तिखट, दोन चमचे साखर किंवा गूळ, मीठ, एक वाटी तेल, फोडणी साहित्य.
तयारी :
बटाटा-फ्लॉवर धुऊन घ्यावा. बटाट्याची सालं काढून फोडी करून घ्याव्यात. फ्लॉवर जाडसर चिरून घ्यावा. मटार, लसूण सोलून घ्यावा. कांदा साधारण बारीक चिरावा. खोबरं किसून, पूड करून घ्यावं. टोमॅटो, कोथिंबीर चिरून, आल्याचे तुकडे करून घ्यावे. जिरं पूड तयार करून ठेवावी. आलं-लसूण मिक्सरमधून फिरवून एकजीव करुन ठेवावं.
कृती :
वाटीभर तेलात एक चमचा मोहरी तडतडल्यावर अर्धा चमचा हिंग, एक चमचा हळद घालून कढीलिंब घालावा, त्यावर आल-लसणाचा वाटलेला गोळा एकदा परतून एक वाटी कोधिबीर, कांदा घालून कांदा गुलाबी होईतो परतावं. त्यावर टोमॅटो घालून ढवळावं. त्यावर मटार, बटाटा-फ्लॉवर घालून परतावं. परतताना तिखट, मीठ, काळा मसाला, जिरे पूड, खोबऱ्याची पूड घालावी. पाच-सात वेळा परतल्यावर सर्व भाज्या बुडून वर इचभर राहील एवढे आधणाचं पाणी घालावे. मध्यम आचेवर भाजीत डाव घालून झाकावं. दहा-पंधरा मिनिटांनंतर त्यात गूळ किंवा साखर घालून ढवळून पुन्हा झाकावं. आणखी दहा-पंधरा मिनिटांनंतर फ्लॉवरची डेख नीट शिजली आहे असं पाहून गॅस बंद करावा. वाढण्याआधी वरून कोथिंबीर पेरावी. कोथिंबीर घातल्यावर झाकण ठेवलं तर ती काळी पडते. काळा मसाला न घालताही ही भाजी छान होते. एक वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातल्यास भाजी पटकन मिळून येते.
2.बटाटा टोमॅटो रस्सा
साहित्य :
दीड किलो बटाटे, एक किलो टोमॅटो, दोन चमचे लाल तिखट, चार चमचे पावभाजी मसाला, मीठ चवीनुसार, एक वाटीभर तेल, फोडणीचं साहित्य, कढीलिंब, कोथिंबीर, एक वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस मिक्सरमधून काढून, दोन चमचे जिरं पूड, एक चमचा आल्याचा व एक चमचा लसणीचा ठेचा, चवीनुसार साखर किंवा गूळ.
कृती :
बटाटे उकडून त्याच्या मध्यम फोडी आणि टोमॅटोच्या जरा मोठ्या फोडी करून घ्याव्यात. फोडणीमध्ये मोहरी-जिरं ते तडतडल्यावर हिंग, हळद, कढीलिंब, आलं-लसूण ठेचा परतून घ्यावा. त्यावर टोमॅटोच्या फोडी थोड्या परताव्या. परतताना तिखट, पावभाजी मसाला, जिरं मूड व खोबरं पूड, थोडी कोथिंबीर घालावी. त्यावर बारा-चौदा वाट्या पाणी घालावं. मीठ व गूळ घालून उकळी आल्यावर बटाट्याच्या फोडी घालाव्या. त्यानंतर पुन्हा एक उकळी येऊ द्यावी.
३. छोले उसळ
साहित्य :
एक किलो छोले, दोन वाट्या चिरलेला कांदा, दीड वाटी बारीक चिरलेला टोमॅटो, एक चमचा लसूण वाटण, एक चमचा आल्याचा ठेचा, एक वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस वा वाटीभर ओलं खोबरं, मीठ, दोन चमचे तिखट, चार चमचे छोले मसाला, एक वाटी तेल, फोडणीचं साहित्य, कोथिंबीर.
कृती:
छोले काटामोड पाण्यात दहा तास भिजवून ठेवावेत. कुकरमध्ये मऊ शिजवावेत. ते बुडतील एवढं पाणी हवं. दोन चमचे तेलावर कांदा गुलाबी परतावा. परतलेला कांदा, खोबरं आलं, लसूण, अर्धी वाटी कोथिंबीर एकत्र वाटावं, फोडणीत कढीलिंब, त्यावर टोमॅटो फोडी घालाव्यात. शिजल्यावर त्यावर वाटणाचा गोळा परतावा. त्यावर मसाला, लाल तिखट, मीठ घालून परतून उकडलेले छोले घालावे. एक उकळी आणावी, आवडीनुसार हवं तसं कमी-जास्त पाणी घालावं.
४. मटार उसळ
साहित्य:
वीस वाट्या सोललेला मटार, चार वाट्या ओलं खोबरं, तीन वाट्या चिरलेली कोथिंबीर, मध्यम तिखटाच्या वीस-बावीस मिरच्या (लाल तिखट घालणार असल्यास मिरच्या निम्म्या घ्याव्यात), दोन चमचे आल्याचा ठेचा, एक चमचा लसूण वाटण, एक वाटी तेल, मीठ, फोडणीचं साहित्य, दोन चमचे जिरं, एक लिंबू, दहा-बारा कढीलिंब पानं.
कृती :
उकळत्या पाण्यात मटार दाणे चिमूटभर सोडा टाकून शिजवून घ्यावेत. ते पाणी काढून टाकावं. खोबरं, आलं, लसूण, मिरच्या, जिरं, मीठ, कोथिंबीर एकत्र बारीक वाटून घ्यावं. फोडणीत कढीलिंब टाकून त्यावर वाटलेला गोळा परतावा. त्यावर शिजवलेला मटार घालून त्यावर दहा-बारा वाट्या गरम पाणी घालावे. उकळी येताना आवडत असल्यास एका लिंबाचा रस घालावा.
५.पालक पनीर
साहित्य :
पाच गड्डया पालक, चारशे ग्रॅम पनीर, चार वाट्या चिरलेला कांदा. चार वाट्या चिरलेला टोमॅटो, दोन चमचे आल्याचा ठेचा, दीड चमचा लसूण वाटण, दीड चमचा धनेपूड, दीड चमचा जिरं पूड, एक चमचा लाल तिखट, पाऊण वाटी तेल.
कृती :
पालकाची पानं निवडून, धुऊन घ्यावीत. उकळत्या पाण्यात चिमूटभर सोडा घालून त्यात पानं घालून दोन मिनिटं उकळावं. पालक रोळीवर अथवा चाळणीत घेऊन त्यावर गार पाणी ओतावे. मिक्सरमधून पानं बारीक वाटून घ्यावी. पाणी घालू नये. कच्चा कांदा, आलं, लसूण, टोमॅटो बारीक वाटून घ्यावं. तेलाच्या फोडणीत मोहरी, जिरे व हिंग घालावा. (हळद घालू नये) नंतर वाटण परतावं. तेल सुटू लागलं की गॅस बंद करून धने, जिरे पूड, तिखट, मीठ व वाटलेला पालक घालावा. मग गॅसवर उकळायला ठेवावं. पनीरचे चौकोनी तुकडे करून पाण्यात टाकावेत. ते तुकडे पाण्यातून काढून उकळत्या भाजीत टाकावे.
६.मटार पनीर
साहित्य :
वीस वाट्या मटार दाणे, दहा वाट्या पनीर तुकडे, अर्धी वाटी खसखस, एक वाटी मगज बी, एक वाटी काजू, चार वाट्या चिरलेला कांदा, तीन वाट्या टोमॅटो तुकडे, दीड चमचा आल्याचा ठेचा, दीड चमचा लसूण वाटण, मीठ, कढीलिंब, एक कप दूध, दोन चमचे बटर, अर्धी वाटी क्रीम वा साय घोटून, एक चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा छोले व अर्धा चमचा पावभाजी मसाला.
तयारी :
काजू, मगज बी, खसखस एकत्र थंड पाण्यात भिजत ठेवावी. पाच तासांनी पाण्यातून काढून बारीक वाटावं. उकळत्या पाण्यात चिमूटभर सोडा घालून मटार दाणे शिजवून घ्यावेत. मटार पूर्ण शिजायला हवा. तो चाळणीवर काढून घ्यावा. टोमॅटो उकळत्या पाण्यातून काढून त्याची सालं काढावीत. दोन-तीन चमचे तेलावर कांदा गुलाबी होईपर्यंत परतावा. परतलेला कांदा, आलं, लसूण व सोललेला टोमॅटो एकत्र वाटून तो गोळा बाजूला ठेवावा.
कृती :
तापलेल्या तेलावर जिरे, हिंग, कढीलिंब टाकून कांदा- टोमॅटो गोळी परतावी. मग खसखस, काजू, मगजबी गोळी परतावी. दूध, बटर, तिखट सर्व मसाले, मीठ घालून ढवळून मटार दाणे व एक ते दीड भांडं पाणी घालावं.
७. टोमॅटो सार
साहित्य :
दोन किलो टोमॅटो, एक चमचा आलं, एक चमचा लसूण वाटण, मीठ, दीड ते दोन वाट्या साखर किंवा गूळ, पाच- सहा चमचे कॉर्नफ्लोअर, फोडणीचं साहित्य, कढीलिंब, कोथिंबीर, दोन वाट्या ओलं खोबरं, दोन चमचे जिरं पूड, अर्धी वाटी तेल एक वाटी चिरलेली कोथिंबीर इ.
तयारी :
टोमॅटो उकडून सालं काढून मिक्सरमधून फिरवून घ्यावे. गाळून बिया काढून टाकाव्यात. कॉर्नफ्लोअर पाण्यात कालवून ठेवावं.
कृती:
हिंग, जिऱ्याची फोडणी करून कढीलिंब घालावा. त्यावर आलं-लसूण वाटण परतावं. त्यावर ओलं खोबरं, कोथिंबीर, जिरं पूड घालून परतावं. त्यावर टोमॅटोचा रस ओतावा. मीठ, साखर घालून एक उकळी आणावी. उकळी आल्यावर पाण्यात कालवलेलं कॉर्नफ्लोअर हळूहळू ओतावं. सतत ढवळत राहावं म्हणजे गुठळी होणार नाही. उकळी आल्यावर खाली उतरवून वरून कोथिंबीर घालावी.
८ . अळू भाजी
साहित्य :
पन्नास अळूची पानं, दोन गड्डया चुका, एक मुळा, एक वाटी कच्चे शेंगदाणे, एक वाटी ओल्या वा सुक्या खोबऱ्याचे काप, एक वाटी हरभऱ्याची डाळ किंवा पंढरपुरी डाळं, सात-आठ हिरव्या मिरच्या, एक चमचा लाल तिखट, चार चमचे गोडा मसाला, अर्धी वाटी चिंचेचा कोळ, दीड ते दोन वाट्या गूळ, मीठ, एक वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस व दोन चमचे जिरं पूंड करून, चार वाट्या तेल, फोडणीचं साहित्य, दोन चमचे मेथी दाणे, दीड वाटी डाळीचं पीठ.
तयारी:
अळू, चुका निवडून जाड चिरून, धुऊन घ्यावे. मुळा धुऊन घ्यावा. सालं काढून त्याचे पातळ काप करावेत. मिरच्या उभ्या चिरून घ्याव्या. सुकं खोबरं व जिऱ्याची पूड करून घ्यावी. दाणे, डाळं भिजत घालावं. सुकं खोबरं घेतल्यास खोबऱ्याचे काप वेगळे भिजत घालावेत. चिंच भिजत घालावी.
कृती :
एका कुकरमध्ये अर्धी वाटी तेलावर नोहरी व एक चमचा मेथीची फोडणी करून त्यात अळू, चुका व चिंचेचा कोळ टाकावा. एक शिट्टी झाल्यावर पाच मिनिटं लहान गॅस ठेवावा. थोडक्यात अगदी गरगट शिजवून घ्यावं. दुसरीकडं कुकरमध्ये मुळ्याचे काप, डाळ, दाणे, खोबरं काप, मिरच्या बुडेल इतकं पाणी घालून शिजवावं. शिजलेल्या अळू-चुक्यात डाळीचं पीठ घालून चांगलं घोटून घ्यावं. आता साडेतीन वाट्या तेलाची मोहरी, एक चमचा मेथी दाणे, हिंग, हळद, कढीलिंब, घालून चांगली खमंग फोडणी करावी. त्यात घोटलेला अळू, गूळ, मीठ, तिखट, मसाला, जिरं- खोबरं पूड आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून उकळावं. शेवटी शिजवलेले दाणे, डाळ, खोबरं, मुळ्याचे काप, मिरच्या घालून चांगलं उकळावं. 
 ९. डाळ तडका
साहित्य :
प्रत्येकी दोन वाट्या तूर, मसूर, मूग डाळ, पंधरा- वीस लाल सुक्या मिरच्या, दीड वाटी तेल, फोडणीचं साहित्य, दोन चमचे बारीक चिरलेला लसूण, दोन चमचे बारीक चिरलेलं आलं, चार वाट्या बारीक चिरलेला कांदा, चार वाट्या बारीक चिरलेला टोमॅटो, दहा-पंधरा कढीलिंबाची पानं, दोन वाट्या बारीक चिरलेली कोथिंबीर, सहा चमचे धने पूड, सहा चमचे जिरं पूड, दोन चमचे लाल तिखट, मीठ, अर्धी वाटी बटर.
कृती:
तिन्ही डाळी निवडून, धुऊन एकत्र मऊसर शिजवून घ्याव्यात.रवीनं घोटून एकजीव कराव्या. दीड वाटी तेलाची फोडणी करून त्यात मोहरी, जिरं, हिंग, हळद, कढीलिंब, बारीक चिरलेलं आलं-लसूण घालून जरा परतावं. त्यावर कांदा गुलाबी होईपर्यंत परतावं, मग टोमॅटो फोडी घालून परतावं. टोमॅटो शिजल्यावर धने-जिरं पूड, तिखट, मीठ, एक वाटी कोथिंबीर घालावी. यावर घोटलेली डाळ घालावी. दरम्यान बटर गरम करुन त्यात लाल मिरच्या घालून खमंग फोडणी तयार करावी. उकळी आल्यावर गरमागरम डाळीवर ओतावी.
१०.कडी
साहित्य:
अडीच लिटर दुधाचं ताजं दही, चार चमचे आल्याचा रस, सात-आठ हिरव्या मिरच्या, कढीलिंबाची मूठभर पानं, अर्धी वाटी साजूक तूप, जिरं, हिंग, हळद, दोन चमचे मेथी, दोन लवंगा, एक वाटी साखर, मीठ, सपाट वाटीभर डाळीचं पीठ.
कृती :
दह्याचं एकजीव ताक करून घ्यावं. डाळीचं पीठ पाण्यात नीट कालवावं. गुठळी राहू देऊ नये. हे कालवलेलं डाळीचं पीठ, आल्याचा रस, मीठ, साखर ताकात घालावं. नीट ढवळावं. तुपाची फोडणी करून जिरं, हिंग, कढीलिंब, मेथी, लवंगा, मिरच्यांचे तुकडे घालावेत. त्यावर ताक ओतून एक उकळी आणावी.
११. मटकी उसळ
साहित्य:
दीड किलो मोडाची मटकी, एक वाटी तेल, कांदा, दोन वाट्या बारीक चिरलेला टोमॅटो, एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव वाटी कढीलिंबाची पानं, दोन चमचे तिखट, गोडा मसाला किंवा कांदा लसूण मसाला यापैकी कोणताही मसाला चार चमचे, पाव वाटी ओलं खोबरं, चवीनुसार मीठ, साखर वा गूळ.
कृती :
मटकी कुकरमध्ये उकडून घ्यावी. नंतर हिंग-मोहरीची फोडणी करून त्यात कढीलिंब, कांदा घालून कांदा गुलाबी रंगावर आल्यावर टोमॅटो घालावा. त्यावर थोडी कोथिंबीर, तिखट, मीठ, मसाला, खोबरं, साखर (किंवा गूळ) हे सर्व घालून परतावं. सगळ्यात शेवटी उकडलेली मटकी घालून एक उकळी आणावी. कितपत पातळ उसळ हवी त्याप्रमाणे मटकीत पाणी ठेवावं.
१२. डाळिंब्याची उसळ
तयारी-
वाल सकाळी कोमट पाण्यात भिजत घालावे. रात्री फडक्यात बांधून ठेवावेत. दुसऱ्या दिवशी सकाळी ते एकदा धुऊन रोळी अथवा चाळणीत निथळत ठेवावेत. सवडीप्रमाणे सोलून पाण्यात घालून फ्रीजमध्ये ठेवावेत. कडवे वाल असल्यास भिजण्यासाठी दोन दिवस लागतात. एक दिवसानंतर पाणी बदलावं लागतं.
साहित्य :
सोललेल्या डाळिंब्या पंधरा वाट्या, चार वाट्या ओलं खोबरं, दोन वाट्या तेल, दोन चमचे आल्याचा ठेचा, बारा- पंधरा चमचे लिंबाचा रस, वाटीभर चिरलेला गूळ, चार चमचे जिरं पूड, तीन चमचे लाल तिखट, मीठ, कोथिंबीर, कढीलिंब.
कृती:
डाळिंब्या कुकरमध्ये शिजवल्यास लगदा होतो म्हणून उकळत्या पाण्यात डाळिंब्या टाकून शिजवून घ्याव्यात. हिंग- मोहरीच्या फोडणीत कढीलिंब, वाटलेलं आलं, लिंबूरस, जिरं पूड, गूळ, कोथिंबीर सर्व टाकून शेवटी शिजवलेल्या डाळिंब्या ओताव्यात. आवडीप्रमाणे रस ठेवावा.
१३. मटकी व घेवडा भाजी
साहित्य:
दहा वाट्या चिरलेला कोवळा श्रावण घेवडा, पाच वाट्या मोडाची मटकी, एक वाटी तेल, फोडणीचं साहित्य, दोन चमचे लाल तिखट, चार-पाच चमचे गोडा मसाला, मीठ, चार चमचे चिरलेला गूळ, एक वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस, दोन चमचे जिरं, कोथिंबीर.
कृती : 
श्रावण घेवडा व मटकी कुकरमध्ये शिजवून घ्यावी. उकडल्यावर पाणी काढून टाकावं. जिरं, खोबरं मिक्सरमध्ये वाटून घ्यावं. फोडणीत अगदी थोडी कोथिंबीर, त्यावर वाटलेलं जिरं- खोबरं, लाल तिखट, मीठ, गोडा मसाला व गूळ घालून ढवळावं. त्यावत घेवडा व मटकी घालून एक उकळी आणावी. वरून कोथिंबीर पेरावी.
१४. बटाटाच्या काचाऱ्या
साहित्य : 
अडीच किलो बटाटे, एक वाटीभर मिरच्यांचे तुकडे, कढीलिंब, मीठ, अडीच वाटी तेल, कोथिंबीर, फोडणीचं साहित्य.
कृती : 
कच्च्या बटाट्याची सालं काढून पातळ काप करावेत. ते पाण्यात टाकावेत. फोडणीत मिरच्यांचे तुकडे व कढीलिंब टाकून त्यावर बटाट्याचे काप, त्यावर चवीप्रमाणे मीठ घालून थोड्या थोड्या वेळाने परतत राहावं. कुरकुरीत झाल्यावर गॅस बंद करावा. वरून कोथिंबीर पेरावी.
१५.बटाट्याची सुकी भाजी
साहित्य : 
अडीच किलो (मध्यम आकाराचे पंचवीस) बटाटे, दोन चमचे आल्याचा ठेचा, एक मूठभर कढीलिंबाची पानं, मीठ, चार चमचे मिरची वाटून, दीड वाटी तेल, फोडणीचं साहित्य, एक वाटी ओलं खोबरं, एक वाटी चिरलेली कोथिंबीर.
कृती :
बटाटे धुऊन, उकडून घ्यावेत. उकडलेल्या बटाट्याची सालं काढून चौकोनी फोडी कराव्या. मोहरी, हिंग, हळद घालून खमंग फोडणी करावी. त्यात कढीलिंब, आलं मिरची वाटण परतून वर फोडी टाकाव्यात. त्यावर मीठ घालून भाजी चांगली ढवळावी. वाढायच्या भांड्यात काढून त्यावर खोबरं कोथिंबीर पेरावी.
१६. डोसा भाजी
साहित्य:
दोन किलो बटाटे (मध्यम आकाराचे चोविस), पाऊण किलो कांदा (मध्यम आकाराचे- दहा-बारा कांदे), पाच-सहा टोमॅटो, एक वाटी उडीद डाळ, दीड वाटी तेल, फोडणीचे साहित्य, कढीलिंब, एक वाटी चिरलेली कोथिंबीर, एक वाटी ओलं खोबरं, एक चमचा आल्याचा ठेचा, एक चमचा लसूण वाटण, चार चमचे मिरची वाटून, दोन चमचे साखर,
कृती :
 कांदा बारीक चिरावा. उकडलेल्या बटाट्याच्या जरा लहान व टोमॅटोच्या मध्यम फोडी करुन घ्याव्यात. तापलेल्या तेलात मोहरी, जिरं, हिंग, हळद घालून त्यावर उडीद डाळ, कढीलिंब, वाटलेलं आलं-लसूण, मिरची परतावं. त्यावर कांदा घालून परतावा. मीठ घालून शिजवून घ्यावा. मग टोमॅटो फोडी घालून हलवाव्यात. नंतर बटाट्याच्या फोडी घालून भाजी चांगली परतावी. वरून कोथिंबीर खोबरं घालावं.
१७. कोबीची सुकी भाजी
साहित्य :
पंचवीस वाट्या बारीक चिरलेला कोबी, वाटीभर मिरच्यांचे तुकडे, एक वाटी तेल, कढीलिंब, फोडणीचं साहित्य, चिरलेली कोथिंबीर
कृती :
कोबी चिरून घ्यावा. वास घालवण्यासाठी पाण्यातून काढावा. फोडणीत मिरच्या कढीलिंब टाकून वर कोबी घालावी. चवीनुसार मीठ घालून परतावं. तीन-चार वाफेत कोबी शिजल्यावर खाली उतरवून वर कोथिंबीर पेरावी. फ्लॉवरची भाजीही याप्रमाणेच करतात.
१८. मसाला भेंडी
साहित्य :
अडीच किलो कोवळी भेंडी, सात-आठ कांदे, पाच-सहा मोठे टोमॅटो, तीन चमचे धन्याची. तीन चमचे जिऱ्याची पूड, तीन चमचे लाल तिखट, सहा चमचे साखर, मीठ, दोन चमचे पाव भाजी मसाला किंवा गरम मसाला, अर्धा किलो तेल.
कृती:
भेंड्या धुऊन, पुसून घ्याव्यात. शेंडा बुडखा काढून टाकावा मोठ्या असल्या तर दोन तुकडे करावेत. पण शक्यतो लहान भेंड्या भेंडीची परत घ्याव्यात. भेंड्यांना मधोमध छेद देऊन कीड नाही नं पाहावं. भेंड्या कडकडीत तेलात तळून घ्याव्यात. कांदा बारीक चिरून घ्यावा. टोमॅटोचा मध्यम फोडी कराव्या. तळणीच्या तेलातील एक वाटी तेलाची फोडणी करावी. त्यात कांदा परतून टोमॅटो घालावा. पुन्हा एकदा परतून त्यात धने-जिरं पूड, मसाले, तिखट, मीठ, साखर, घालावं. परतून त्यावर तळलेल्या भेंड्या घालाव्या. हलक्या हातनं एकत्र करावं.
१९. भेंडीची परतलेली भाजी
साहित्य:
तीन किलो भेंड्या, एक वाटीभर मिरच्यांचे तुकडे वा तीन चमचे लाल तिखट, तीन वाट्या तेल, फोडणीचं सामान, मीठ.
कृती :
भेंडी धुऊन, पुसून घ्यावी. काचऱ्या कराव्या. एका वेळी एक ते दीड किलोचीच भाजी करावी. म्हणजे तार येत नाही. कडकडीत तेलाच्या फोडणीत मिरच्यांचे तुकडे घालावेत. त्यावर भेंडीचे काप व मीठ टाकून मोठ्या आचेवर हलक्या हातानं सतत हलवावं. भेंडी लवकर शिजते. लाल तिखट घालायचं असल्यास भेंडी शिजल्यावर घालावं म्हणजे खाट उडत नाही
२०. सांबर
साहित्य :
एक भांडं मसूर डाळ, एक भांडं मूग डाळ, दुध्या किंवा तांबडा भोपळा अर्धा किलो, कांदे पाव किलो, टोमॅटो पाव किलो (किंवा चिंचेचा कोळ), सुक्या तांबड्या मिरच्या, कढीलिंब, दीडशे ग्रॅम सांबार मसाला, तेल, मीठ, फोडणीचं साहित्य.
कृती :
दोन्ही डाळी धुऊन ठेवाव्या. दुधी भोपळा घेणार असल्यास तो चिरून, शिजवून घ्यावा. तेलाची हिंग-मिरच्यांची फोडणी करून त्यात कढीलिंब, चिरलेला कांदा घालून परतावं. टोमॅटोच्या फोडी घालून पाणी घालावं. दोन्ही डाळी घालाव्यात शिजतानाच त्यात सांबार मसाला, गूळ, मीठ घालावं. शिजत आल्यावर त्यात भोपळ्याच्या फोडी घालाव्या. सांबार उकळावं.
२१. तोंडल्याची भाजी
साहित्य : 
दोन किलो तोंडली, चार चमचे तिखट, चार चमचे गोडा मसाला, मीठ, एक वाटी डाळीचं पीठ, दोन वाट्या तेल, फोडणीचं साहित्य, चिरलेली कोथिंबीर.
कृती:
तोंडली धुऊन डेखं काढून टाकावीत. तोंडल्याच्या गोल काचऱ्या पाण्यात टाकाव्या. हिंग-मोहरीची फोडणी करून त्यावर तोंडल्याच्या काचऱ्या व मीठ घालावं. कढईवर झाकण ठेवून त्यावर पाणी घालावं. तोंडली पटकन शिजत नाहीत. शिजल्यावर तिखट व गोडा मसाला घालावा. पीठ पेरून मंद आचेवर खरपूस होईतो ढवळावी. वरून कोथिंबीर पेरावी.
२२. श्रावण घेवडा
साहित्य :
तीन किलो कोवळा श्रावण घेवडा, वाटीभर ओलं खोबरं, एक वाटी ओल्या लाल मिरच्यांचे तुकडे, कढीलिंब, तीन वाटी तेल, फोडणीचं साहित्य, मीठ.
कृती :
फोडणीत कढीलिंबाची पानं, मिरच्यांचे तुकडे परतून, त्यावर बारीक चिरलेला श्रावण घेवडा टाकावा. चवीनुसार मीठ घालून हलवून शिजवावी. वरून कोथिंबीर खोबरं घालावं.
२३. सिमला मिरचीची परतून भाजी
साहित्य :
चार किलो सिमला (ढोबळी) मिरची, मीठ, चार ते पाच चमचे लाल तिखट, दोन वाट्या डाळीचं पीठ, अडीच ते तीन वाट्या तेल, फोडणीचं साहित्य, दोन वाट्या ओलं खोबरं, आठ चमचे साखर.
२४. सिमला मिरचीची भरून भाजी
साहित्य
चाळीस-पंचेचाळीस छोट्या आकाराच्या सिमला (ढोबळी) मिरच्या, चार वाट्या डाळीचं पीठ, चार वाट्या ओलं खोबरं, दोन चमचे धने पूड, दोन चमचे जिरे पूड, चार चमचे तिखट, मीठ, साखर चवीनुसार, एक वाटी चारीक चिरलेली कोथिंबीर, चार वाट्या तेल, फोडणीचं साहित्य.
कृती:
प्रथम देठाकडून सिमला मिरची थोडी चिरून बिया काढून टाकाव्यात. आता तेलावर डाळीचं पीठ चांगलं फुलून येईपर्यंत भाजून घ्यावं. ते गार झाल्यावर त्यात मीठ, साखर, धने, जिरे पूड, तिखट व ओलं खोबरं घालून सर्व मसाला एकजीव करुन घ्यावा. मिरच्यांमध्ये तो मसाला भरावा. सर्व मिरच्या तयार झाल्यावर एका पसरट पातेलीत किंवा कढईत दोन वाट्या तेल घेऊन फोडणी करावी व त्यावर या मिरच्या मसाल्याची बाजू वर येईल अशा लावून घ्याव्यात व त्यावर ताट टाकून मंद आचेवर वाफ द्यावी. थोड्या थोड्या वेळानं ताट काढून मिरच्या हलवाव्यात व शिजल्यावर गॅस बंद करावा. या मिरच्या लवकर शिजतात.
२५. मिक्स व्हेज
साहित्य:
पाच वाट्या वांग्याच्या फोडी, एक वाटी बटाट्याच्या फोडी, दोन वाटी सोलाणे, दोन वाटी पावटा दाणे, दोन वाट्या पापडी, दोन वाट्या गाजराचे तुकडे, दोन वाट्या तिळकूट, दोन वाट्या तेल. फोडणीचं साहित्य, एक वाटी चिरलेली कोथिंबीर, दोन चमचे गोडा मसाला, एक वाटी सुकं खोबरं भाजून कुटलेलं, दोन चमचे जिरं पूड, चार वाट्या चिरलेला कांदा, अर्धी वाटी गूळ, मीठ, दोन चमचे तिखट.
तयारी:
प्रथम सुकं खोबरं भाजून कूट करावा. तीळ भाजून त्याचा कूट करावा. कांदा गुलाबी भाजून घ्यावा. तो वाटून घ्यावा. आवडत असल्यास त्यात थोडा लसूण घालावा. सर्व भाज्या निवडून चिरुन घ्याव्यात व पाण्यात टाकून ठेवाव्यात.
कृती-
फोडणीत मोहरी, जिरं, हिंग, हळद घालून सर्व भाज्या फोडणीत टाकाव्यात व परतत राहावं. परतताना त्यात मीठ, तिखट, मसाला, जिरं पूड, खोबरं कूट, थोडी कोथिंबीर टाकून थोडं परतून घ्यावं व नंतर त्यात आधणाचं पाणी घालावं. भाज्या बुडतील व वर दोन वाट्या राहील इतपत पाणी घालावं. भाज्या शिजेपर्यंत पाणी आटतं. परत हवं असल्यास पाणी घालावं. भाज्या शिजत आल्यावर तीळ कूट व गूळ घालावा. भाज्या पूर्ण शिजल्यावर उरलेली कोथिंबीर वर घालावी.
२६. आलू पराठा
साहित्य
चार किलो बटाटे, दीड चमचा लसूण वाटण, दीड चमचा आल्याचा ठेचा, चार-पाच हिरव्या मिरच्यांचं वाटण, दीड वाटी चिरलेली कोथिबीर, मोठ, बारा व चार चमचे साखर, पंधरा ते अठरा चमचे लिंबूरस, , पाच वाट्या कणीक, पाच वाट्या मैदा, पाऊण वाटी तेल.
कृती:
बटाटे उकडून घ्यावेत. गार झाल्यावर किसून घ्यावेत. त्यात जाटलेले आल-लसूण-मिरची, चिरलेली कोथिंबीर घालावी. मीठ, बारा चमचे साखर, लिंबूरस घालून तेलाच्या हातानं सारखं कालवून गोळे करून ठेवावेत. बटाटे उकडत लावल्यावर एकीकडं कणीक आणि मैदा एकत्र करून त्यात मीठ, चार चमचे साखर, पाऊण वाटी तेल घालून साध्या पोळ्यांप्रमाणे कणीक भिजवून ठेवावी. कणीक आणि बटाट्याचा गोळा यांचा घट्टपणा सारखाच असावा. कणकेच्या दुप्पट बटाट्याचं सारण घेऊन उंडा तयार करावा आणि परोठा लाटावा. तव्यावर खमंग भाजावा. तेल सोडायची आवश्यकता नसते. दिलेल्यां प्रमाणात पन्नास ते पंचावन्न परोठे होतात.
२७. मेथी पराठा
साहित्य:
पंचवीस वाट्या मेथीची पाने (पाच ते सहा गड्ड्या), चौदा वाट्या कणीक, दोन वाट्या डाळीचं पीठ, चार चमचे हिरव्या मिरच्चाचे वाटण, चार चमचे लसूण वाटण, तीन वाट्या तेल, मीठ.
कृती:
मेथीची पानं खुड्न, धुऊन घ्यावीत. बारा-पंधरा वाट्या (मेषी बुडेल इतके) पाणी उकळत ठेवावं. उकळत्या पाण्यात चिमूटभर सोडा घालून मेथीची पानं त्यात टाकावीत. दोन मिनिटांनी गॅस बंद करून पाणी काढून टाकावं. मेथीची पाने मिक्सरमधून काढावीत. त्यात वाटलेलं आलं- लसूण-मिरच्या, मीठ, डाळीचं पीठ घालावं. एक वाटी तेल गरम करून त्या पिठावर ओतावं. त्यात मावेल तेवढी (बारा ते चौदा वाट्या) कणीक घालून पीठ भिजवावं. साधारण पोळ्यांसारखाच गोळा होतो. पोळीसारखीच त्रिकोणी घडी घालून भाजताना पोळीसारखाच तेलाचा हात लावून खमंग परोठे भाजावेत. यात साठ ते पासष्ट परोठे होतात.
 
                               धन्यवाद ............
कृपया शेयर करा.


Post a Comment

1 Comments

Thank you / आभारी आहोत.
Please share and follows.

Close Menu